नवी दिल्ली - हरियाणामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरची मंडळी हैवान झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावात हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे 22 वर्षीय विवाहितेची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात आत्महत्या दाखविण्यासाठी तिचा मृतदेह गळफास लावून लटकवण्यात आला होता. लग्नाला अद्याप 9 महिने देखील पूर्ण झाले नव्हते. हुंड्याच्या हव्यासामुळे विवाहितेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खांबी गावातील निवासी जगदीश यांची मुलगी भावना हिचं लग्न 26 एप्रिल 2021 रोजी औरंगाबाद गावातील निवासी राधेश्याम यांचा मुलगा गौरव शर्मासोबत झालं होतं. गौरव भारतीय सैन्यात कार्यरत आहे. लग्न मोठ्या थाटामाटात लावून देण्यात आलं होतं. ज्यात लाखो रूपये खर्च करण्यात आले होते. जगदीशने मुलीच्या लग्नात बराच हुंडा दिला होता, मात्र लग्नाच्या 4 - 5 दिवसांनंतरही हुंड्यासाठी तिला त्रास दिला जात होता.
भावनाचा भाऊ धीरजने दिलेल्या माहितीनुसार, भावनाला तिच्या सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. त्यांनी सांगितलं की, सासरच्या मंडळींना भरपूर हुंडा देण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच सासरच्या मंडळींना भावनाकडून 10 लाख रुपये मागितले होते. पैसे मिळाले नाहीतर तर पती, सासरे, सासू, दीर आणि त्याच्या दोन बहिणींनी भावनाचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह गळफास लावून लटकवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भावनाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तरी या प्रकरणात तपास सुरू आहे. मुंडकटी पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर दलवीर सिंह यांनी औरंगाबादमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची सूचना मिळाली होती. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी हुंड्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.