वाशिम - गावाकडे घर बांधकामासाठी पायाचे खोदकाम करताना माझ्या नातेवाईकांना सोन्याच्या 2 किलो गिन्न्या सापडल्या असून त्यांना त्या विकायच्या आहेत. मी तुम्हाला ते कमी भावात मिळवून देतो, असे खोटे सांगून नाशिक जिल्ह्यातील तीन जणांची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. वाशिम जिल्ह्याच्या शेंदला तालुका मेहकर येथे बोलूवन संबधित तिघांना आरोपींकडून मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांचे 12 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल व नगदी 2 लाख 65 हजार घेऊन आरोपी फरार झाल्याची घटना 20 ऑगस्ट रोजी घडली होती.
वाशिम येथील शेषराव घाटोळकर याने नाशिक येथे कामासाठी गेलेला असताना ओळख झालेल्या दिंडोरी तालुक्यातील योगेश दत्तू मोरे यास सोन्याच्या गिन्न्याचं अमिष दाखवलं. माझ्या नातेवाईकाला घर बांधकामासाठी पाया खोदताना 2 किलो सोन्याच्या गिन्न्या सापडल्या असून त्यांना त्या विकायच्या आहेत. तुम्हाला घ्यायचे असल्यास कमी भावात द्यायला लावतो, असे सांगून एक गिन्नी घाटोळकर याने तेथे आणून दाखविली. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट आपल्या गावातील रमेश सांगळे यांना सांगितल्यानंतर योगेश दत्तू मोरे, रमेश बाबुराव सांगळे व त्यांच्या पुतण्या आकाश किशोर सांगळे या तिघांनाही मोह झाला. त्यामुळे, 20 ऑगस्ट रोजी तिघांनी स्विफ्ट गाडी क्रमांक MH 15 CT 1933 मधून सोन्याच्या गिन्न्या घेण्याच्या उद्देशाने जानेफळ ता. मेहकर येथे पोहोचले. बायपास मार्गावर शेषराव घाटोळकर रा. वाशिम याने या तिघांची भेट घेऊन गिन्न्या खरेदी विषयी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून शेंदला येथील पारधी वस्तीतील एका घरात नेले.
या घरात अगोदरच 10 ते 12 अनोळखी इसम बसले होते, तेव्हा सोने घेण्यासाठी पैसे आणले का? पैसे आणले असतील तर कोठे आहेत ते आम्हाला दाखवा, असे म्हणत अरेरावी केली. त्यावर, सोन्याच्या गिन्न्या दाखविल्यानंतर पैसे देतो अशी अट तिघांनीही घातली. त्यामुळे, अनोळखी इसमांनी तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी शेषराव घाटोळकर हा तिथून निघून गेला होता. मारहाण करताना रमेश बाबुराव सांगळे (रा.नवी धागोर ता.दिंडोरी जि.नाशीक) यांच्या खिशातील मोबाईल किंमत ६ हजार रुपये व नगदी 5 हजार रुपये तसेच योगेश मोरे (रा.नवी धागोर ता.दिंडोरी जि.नाशिक) यांच्या खिशातील मोबाईल किंमत 6 हजार रुपये नगदी 10 हजार रुपये काढून घेतले. तसेच मारहाण होत असताना जीवाच्या भीतीने सोबत आणलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये ठेवलेले 2 लाख 50 हजार रुपये सुद्धा हिसकावून घेण्यात आले.
फिर्यादी वस्तीतून पळून जात असताना त्यांना धमकी देऊन पोलीस स्टेशनला गेल्यास, आमच्या महिलांसोबत छेडछाड केल्याची तक्रार तुमच्याविरुद्ध देऊ अशी दमदाटीच आरोपींनी केली होती. मात्र, रमेश सांगळे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला पोहोचून हकीकत सांगितल्यानंतर ठाणेदार राहुल गोंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच, इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.