नवी दिल्ली - आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं असं पालकांना वाटत असतं. अनेकदा मुलांनी हट्ट केला, ऐकलं नाही किंवा अभ्यास केला नाही. तर पालक शिक्षा देतात. पण हिच शिक्षा एका मुलीच्या जीवावर बेतली आहे. मुलीने अभ्यास केला नाही म्हणून आई-वडील हैवान झाले. त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत चार वर्षीय लेकीचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या जमशेदपूरमध्ये ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या पालकांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम मैती आणि त्यांची पत्नी अंजना मैती यांनी मुलीला दोरीला बांधून मारहाण केली. त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. हे दोघंही मजुरीचं काम करतात. त्यांना आणखी एक मुलगी असून ती तिच्या मामाकडे राहते. दाम्पत्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुलीला वारंवार समजून सांगितलं पण तिला अभ्यासात अजिबात रस नव्हता. त्याचवेळी रागाच्या भरात मुलीला बेदम मारहाण केली होती.
मुलीची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ते दोघे सलगाझूरी स्टेशनला पोहोचले. तिथे एका ट्रेनमध्ये चढले आणि गालूडीह स्टेशनवर उतरले. त्यांनी मुलीचा मृतदेह हा रेल्वे ट्रॅकजवळ असलेल्या झुडुपात फेकून दिला आणि दोघे पश्चिम बंगालच्या झाडग्राम येथे गेले. ते जेव्हा आपल्या गावी परत आले. तेव्हा शेजाऱ्यांनी मुलीची विचारपूक केली.
शेजाऱ्यांनी मुलीबाबत विचारलं पालकांनी त्यांना नीट उत्तर दिलं नाही. शेजाऱ्यांना दाम्पत्यावर संशय आणि त्यांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा दाम्पत्याने घडलेला सर्व भयंकर प्रकार सांगितला. आईवडील नेहमीच मुलीला मारत असल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलीस अधिक तपास करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.