प्रगती जाधव पाटील
सातारा - ज्या लेकराच्या तोंडून अजून बोबडे बोलही गेले नाहीत, त्या लेकरावर लैंगिक अत्याचार होणं क्लेशकारक आहे. साताऱ्या घडलेल्या या घटनेने समाज व्यवस्थेची धोकादायक मानसिकता बदलल्याची घंटा दिली आहे. यावर वेळीच आळा घातला नाही तर मुलींना घरातून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करणारे तयार होण्याआधी ही विकृती ठेचण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे.
भल्या पहाटे शासकीय कार्यालयाच्या आवारातून अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले जाते... चार-पाच किलोमीटर अंतर पार केल्यानंतर मारहाण करूनतिच्यावर लैंगिक अत्याचार होतो... असह्य वेदना सोसत श्वापदांच्या वावर क्षेत्रात ती निपचीत पडते... तीच म्हणून हे सोसू शकली दुसरी असती तर जगणंच मुश्कील ही तिला पाहणाऱयंची प्रतिक्रिया! महिलांच्या पोषाखावरून तर कधी रात्री प्रवास करण्याला धाडसाचे नाव देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याचे समर्थन करणाऱ्या अनेकांना या घटनेने नि:शब्द केले आहे.
बेघर असलेली ही चिमुरडी आपल्या कुटूंबियांसह शासकीय इमारतीच्या आडोशाने गेली काही दिवस वास्तव्यास होती. रोजच्या प्रमाणेच त्यादिवशीही झोपेत असतानाच तिच्यावर दृष्ट नजर पडली आणि सुरक्षित आयुष्यातील असुरक्षिततेचे घाव तिला गुप्तांगासह शरिरावर सोसावे लागले. पुण्यात उपचाराला उत्तम प्रतिसाद देणारी ही धिटुकली अद्यापही बोलण्याच्या परिस्थितीत नाही. तिने तोंड उघडल्यावरच अत्याचार करणाऱ्याचा चेहरा समाजासमोर येणार आहे.
बेशुध्द अवस्थेततही जगण्यासाठी धडपड!
सातारा शहरातील मध्यवर्ती ठिक़ाणाहून भल्या पहाटे या चिमुरडीला गाडीवर बसवून नेण्यात आले. मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर बेशुध्द अवस्थेत तिला एका गावाच्या हद्दीत टाकून आरोपी तिथून फरार झाला. फिरायला बाहेर पडणाऱ्या लोकांनी या मुलीची अवस्था पाहिली आणि ते हादरले. गुप्तांगासह रक्तबंबाळ झालेले शरीर एकीकडे थकले होते. पण बेशुध्द अवस्थेतही जगण्यासाठी तिची धडपड सुरू होती.
काम साताऱ्यात अधिकार सांगलीत!
सातारा जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तत्कालीन जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी व बाल कल्याण समिती यांच्या बालकांच्या निर्णयावरून झालेल्या वादातून काही महिन्यांपूर्वी साताºयाची हक्काची समिती आता अस्तित्वात नाही. शासकीय पातळीवर नवीन समिती स्थापन करण्याची सवड आणि संवेदनशीलता शासकीय यंत्रणांकडे नाही. सातारा समितीचे अधिकार सांगलीकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. त्यामुळे वर्षभरात अवघ्या चार ते पाच वेळेलाच समितीच्या कामकाजाच्या प्रत्यक्ष बैठका झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अत्याचार झालेल्या चिमुकलीला सपोर्ट पर्सन तर तिच्या पालकांना समुपदेशन करण्याची तातडीने कार्यवाही व्हावी. याबरोबरच तिच्या शारीरिक उपचारांबरोबरच तिचे पुर्नवसन होईपर्यंत बाल कल्याण समितीने तिच्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. कुटूंबियांना न्यायालयीन कारवाईबाबत मार्गदर्शन करणेही आवश्यक आहे.
- अॅड. मनिषा बर्गे, सातारा
या प्रकरणात आम्ही विविध शक्यता तपासत आहोत. पोलिसांची पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संबंधीत इसम प्रौढ असून त्याच्याबाबत काही प्राथमिक माहिती हाती लागली आहे. यात लवकरच यश मिळेल असा विश्वास आहे.
- व्हि. बी. घोडके, पोलीस निरिक्षक, सातारा