कवठेमहांकाळ - जंडियाला-अमृतसर (पंजाब) येथील सराफी दुकानातील दोन किलो सोन्याच्या चोरीप्रकरणी जंडियाला व कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकाने नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे छापा टाकून चाळीस लाख रुपये किमतीचे ८१५ ग्रॅम सोने हस्तगत केले. याप्रकरणी विठ्ठल दादू कदम (रा. नरसिंहगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात मुख्य संशयित असलेला त्याचा मुलगा फरार आहे.
जंडियाला-अमृतसर येथील सराफी दुकानातून दोन किलोहून अधिक सोने चोरीस गेल्याप्रकरणी जंडियाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या दुकानात नरसिंहगाव येथील विठ्ठल कदम यांचा मुलगा कामाला होता. तपासादरम्यान मुख्य संशयित म्हणून कदम यांच्या मुलाचे नाव समोर आले. यानंतर जंडियाला पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दविंदर सिंह यांच्यासह पथक शनिवारी कवठेमहांकाळ येथे दाखल झाले. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर जंडियाला पोलीस आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत नरसिंहगाव येथील विठ्ठल कदम याच्या घरी छापा टाकला.
विठ्ठल कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चोरीतील सोन्यापैकी ८१५ ग्रॅम सोने मिळून आले. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४० लाख रुपये आहे. दरम्यान, मुख्य संशयित असलेला विठ्ठल याचा मुलगा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जंडियाला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दविंदर सिंह आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक सागर गोडे, शिवाजी करे, पोलीस नाईक अमिरशा फकिर, शिपाई विनोद चव्हाण, दीपक पवार यांनी ही कारवाई केली.