ठाणे: अंबरनाथच्या खोणी भागात उभ्या असलेल्या टँकरमधून पेट्रोलीयमजन्य पदार्थांची चोरी करणाऱ्या गयानचंद वर्मा (३२, रा. शिवडी पुर्व, मुंबई) याच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. या टोळीकडून पेट्रोलजन्य पदार्थ आणि चार टँकरसह एक कोटी तीन लाख आठ हजारांचा मुददेमाल जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी गुरुवारी दिली.
अंबरनाथच्या खोणी भागातील रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधील पेट्रोल तसेच डिझेल चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संजय बाबर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सुधाकर हुंबे, उपनिरीक्षक थॉमस डीसोझा, हवालदार बाबर, कल्याण ढोकणे आणि तानाजी पाटील आदींच्या पथकाने १९ जानेवारी २०२२ रोजी या भागात सापळा रचून वर्मा तसेच अमन सरोजा (२२) संजय सिंह (३४), प्रयागसिंह उर्फ रविसिंह सिंग (३४), अंसर वर्मा, (३४ ) सदिप वर्मा, (२६), अनिल चिकणकर (३०, रा. अंबरनाथ) यांना २६ टनाचे दोन, २१ टनाचा एक आणि तीन टनाचा एक अशा चार पेट्रोलियम पदार्थांच्या टँकरसह अटक केली. यातील अनिल चिकणकर वगळता इतर सर्व मुंबईतील शिवडी येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात चोरी तसेच पेट्रोलीयम उत्पादने (देखभाल उत्पादन, साठवणुक, पुरवठा व विक्री) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या टोळीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून डिझेल म्हणून वापरात येणारे बेस आईल जप्त केले आहेत. या डिझेलची ही टोळी काळया बाजारात विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे.