ठाणे - एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी करून वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय तरुणीसह ८० बेरोजगारांना ३१ लाख २६ हजारांना गंडा घालणाऱ्या दर्शना पराडकर (३२) आणि पंकज साळवी (३३) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
मेट्रोचे बनावटरीत्या नाव वापरून आरोपी संजय पाटील उर्फ पंकज साळवी आणि त्याची साथीदार दर्शना पराडकर हिने एमएमआरडीएच्या मेट्रो रेल्वेमध्ये नोकरी असल्याची जाहिरात दिली होती. त्याच जाहिरातीच्या आधारे २७ सप्टेंबर २०२० ते ७ मार्च २०२० या कालावधीमध्ये वागळे इस्टेट येथील एका २८ वर्षीय महिलेला स्टेशन मास्तरच्या जागेची ऑफर दिली होती. त्याच नावाखाली तिच्याकडून काही पैसेही उकळले. तिच्यासह अन्यही ७९ तरुणांना मेट्रोमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३१ लाख २६ हजार ८०० रुपये घेतले. अर्थात, त्याबदल्यात त्यांना मेट्रो रेल्वे कोणतीही नोकरी लावली नाही. तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत न करता त्यांची फसवणूक केली. त्याबाबत त्यांनी वारंवार विचारणा करूनही वेगवेगळी उत्तरे दिली. काही वेळा आता लवकरच काम होणार आहे, असे सांगण्यात आले तर कधी नेमणुकांनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील तक्रारदार तरुणीचा या भामट्यांवर संशय बळावल्यामुळे तिने संजय उर्फ पंकज साळवी आणि दर्शना पराडकर उर्फ अंकिता अशा दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मुतडक, जमादार संजय सावंत, हवालदार मिलिंद मोरे, पोलीस नाईक प्रमोद दळवी आणि नीलम महाले आदींच्या पथकाने बोरीवलीतून आरोपींपैकी दर्शना आणि पंकज या दोघांना ८ मार्च रोजी अटक केली.
पोलिसांचे आवाहन मेट्रोमध्ये नोकरीच्या आमिषाने आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी वागळे इस्टेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी केले आहे. यातील आरोपींनी प्रत्येक वेळी आपली नावे वेगवेगळी सांगितल्याचेही समोर आले आहे.