Crime News: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नातेवाईकाला पित्याने दिली क्रूर शिक्षा, तीन तुकडे केले आणि नदीत फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:40 PM2022-03-28T16:40:26+5:302022-03-28T16:41:06+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामध्ये एक भयानक हत्याकांड घडले आहे. येथे एका वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नातेवाईकाची हत्या करून तीन तुकडे केले. त्यानंतर हा मृतदेह नग्नावस्थेत नदीत फेकला. पोलिसांनी नदीतून मृताच्या शरीराचे अवशेष ताब्यात घेतले आहेत.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामध्ये एक भयानक हत्याकांड घडले आहे. येथे एका वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नातेवाईकाची हत्या करून तीन तुकडे केले. त्यानंतर हा मृतदेह नग्नावस्थेत नदीत फेकला. पोलिसांनी नदीतून मृताच्या शरीराचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. आरोपीने मेव्हण्यासोबत मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. मृताचे शरीर नदीशेजारी असलेल्या शिव मंदिराजवळ कापण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र नावाचा तरुण नदीत स्नान करण्यासाठी गेला होता. तत्पूर्वी तो तेथील शिव मंदिराजवळ गेला असता त्याला धक्काच बसला. मंदिरासमोर रक्त पसरलेले होते. त्यानंतर त्याने नदीमध्ये पाहिले असता, त्याला डोके, धड आणि पाय दिसले. तो तिथून घाबरून घरी आला. त्याने ही माहिती सरपंचांना दिली. त्यानंतर तिथे पोलीस बोलावण्यात आले. पोलिसांनी पाणबुड्यांना बोलावून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. दरम्यान, सदर मृतदेह कुऱ्हाड आणि अन्य धारदार हत्याराने कापण्यात आल्याचे फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मृताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या डोक्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यातून सदर मृत व्यक्ती त्रिलोकचंद (५५) असल्याचे समोर आले. तसेच त्याचं घर सक्तापूर येथून १६ किमी दूर असलेल्या बोडानी गावात असल्याचे समोर आले. तसेच त्याचे वडील माजी सरपंच असल्याचीही माहिती मिळाली.
दरम्यान, त्रिलोकचंदचं वर्तन योग्य नव्हतं. त्यामुळे त्याची पत्नीसुद्धा १२ वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. त्याचा एक मामेसासराही आहेत. त्याच्या घराकडील छन्नू नावाच्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी सक्तापूरमध्ये जमीन दिली होती. या छन्नूची १४ वर्षांची मुलगी आहे. तिच्यावर त्रिलोकचंदची वाईट नजर होती. त्याने तिची अनेकदा छेड काढली होती. त्यामुळे छन्नूने त्याला अनेकदा समजावले होते. मात्र त्रिलोकचंद ऐकला नाही. दरम्यान, शनिवारी त्रिलोकचंदने पुन्हा एकदा गावात येत छन्नूच्या मुलीची छेड काढली. त्यामुळे छन्नूचा राग अनावर झाला. त्याने मेव्हणा उमेशला सोबत घेऊन त्रिलोकचंदला गाडीवर बसवून नदी किनारी आणले. तिथे मासे कापायच्या हत्याराच्या मदतीने त्यांनी त्रिलोकचंदचा खून केला आणि मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकले.