इंदूर - कथा पारायण करणाऱ्या एका पंडितजींनी इंदूरमधील तब्बल तीन हजार महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलांनी सुरुवातील या महाराजांचा शोध घेतला मात्र ते मिळाले नाहीत. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अखेर पोलिसांनी या बाबाजींचा शोध घेतला. आता ते तुरुंगात आहेत.
इंदूरमधील द्वारकापुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अशा एका ठकसेन कथावाचक बाबांना पकडले आहे ज्याने शहरातील तीन हजारांहून अधिकी महिलांवा चुना लावला आहे. त्याने कथावाचनाच्या नावाखाली ४० लाख रुपये लुबाडले आहेत. आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत. त्यामधून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
इंदूरच्या द्वारकापुरी पोलिसांनी अटक केलेला हा बुवा लाखो रुपयांचा गंडा घालून पसार झाला होता. या कथावाचक बुवाचं नाव प्रभू महाराज ऊर्फ अजित सिंह चौहान आहे. तो गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पोटादा गावातील रहिवासी आहे.
प्रभू महाराज ऊर्फ अजित सिंह चौहान याने फेब्रुवारी २०२१ मध्ये इंदूरच्या सूर्यदेवनगरमध्ये कथेचं आयोजन केलं होतं. तसेच लवकरच अशीच एक कथा हरिद्वार येथे आयोजित केली जाईल, असं त्याने सांगितलं. त्याच्या नादी लागून हजारो महिलांनी एक हजार रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम या बुवाकडे दिली. तसेच महिलांनी कथा पारायणासाठी येण्याजाण्याचा खर्च आणि तिथे थांबण्याचे खाण्या-पिण्याचे पैसेही जमा केले. अशा प्रकारे एकूण ४० लाख रुपये पंडितजींकडे जमा झाले होते. अखेर फरार झालेल्या या बुवाला पोलिसांनी गुजरातमधून शोधून काढले आणि त्याच्या हातात बेड्या ठोकल्या.