- अझहर शेख
नाशिक - एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव रचून लग्नाचे आमीष दाखवत वेळोवेळी वर्षभर शारिरिक अत्याचार केल्याची घटना सहा वर्षांपुर्वी दिंडोरी तालुक्यात घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता. न्यायाधीश डी.डी.देशमुख यांनी आरोपी अनिल खंडेराव गायकवाड (२१) यास दोषी धरले. त्यास सात वर्षांची सक्तमजुरी व १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपी अनिल याने तिला एकटे गाठून तिच्यावर तो प्रेम करतो असे सांगून बनाव केला. तसेच लग्नाचे आमीष दाखवून वर्षभर वेळोवेळी शारिरिक अत्याचार केल्याचे फिर्यादित म्हटले होते. शरिरसंबंधामुळे पिडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिने एका स्त्री जातीच्या पुर्ण कालावधीपर्यंत वाढ न झालेल्या अर्भकालाही जन्म दिला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी अनिलविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत(पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरिक्षक अनंत तारगे यांनी याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी देशमुख यांच्या न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत सरकारपक्षाकडून ॲड. दीपशिखा भीडे यांनी युक्तीवाद केला. भीडे यांनी यावेळी सहा साक्षीदार तपासले. यावेळी अनिलविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायलयाने त्यास शिक्षा सुनावली.