बुलडाणा - शेत रस्त्याच्या वादातून तीन आरोपींनी महिलेला जबरदस्तीने विष पाजल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजेदम्यान तालुक्यातील कोकलवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील पीडित ३१ वर्षीय विवाहित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये शेता शेजारील गावांतीलच रामेश्वर दादाराव भगत, योगेश दादाराव भगत, मोहन शंकर भगत यांचे शेत आहे. नेहमी शेतरस्त्याच्या कारणावरून त्यांचा वाद होतो. ११ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पीडित महिला रामेश्वर भगत यांच्या शेतातून जनावरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होती. त्यावेळी रामेश्वर भगत, योगेश भगत व मोहन भगत यांनी शेतरस्त्यावरून वाद घालत मारहाण केली. या पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला.
आरोपी श्रीमंत असून आपली बदनामी होईल, अशी समज दिली. अखेर या पीडित महिलेने एक चिठ्ठी लिहून तणनाशक पिण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी शेतात गेली. त्यावेळी तेथे आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करीत पीडित महिलेकडील तणनाशकाची बाटली काढून तिला पाजली. महिला शेतात बेशुद्धावस्थेत पडून होती. त्यानंतर पीडितेच्या पतीने तिला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.