ठाणे : बनावट नोटा घेऊन आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट ५ ने गायमुख येथे सापळा रचून शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हजार रुपये चलनाच्या आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा त्यांनी ज्यांच्याकडून घेतल्या त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.राम शर्मा (वय ५२, रा. विरार) व राजेंद्र राऊत (५८, रा. कुरगाव, पालघर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी मदन चौहान (रा. पालघर) यांच्याकडून या नोटा आणल्याचे तपासात उघड झाले आहे. काहीजण बनावट नोटा चलनात आणण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती कासारवडली पोलिसांना मिळाली होती.
दोन हजाराच्या नोटांची ४०० बंडले ताब्यात एका कारमधून दोघे तेथे आले असता, मोठ्या शिताफीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्या बनावट असल्याचे तपासात उघड झाले. त्यांच्याकडून दोन हजाराच्या नोटांची ४०० बंडले ताब्यात घेण्यात आली, ज्याची किंमत आठ कोटी रुपये एवढी आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात आला.
पालघरमध्ये छापल्या नोटा चौहान व इतर साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पालघर येथील कंपनीच्या कार्यालयात या नोटा छापल्या असल्याचे शर्मा, राऊत यांनी चौकशीत सांगितले. तसेच या नोटा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचेही कबूल केले.