फरीदाबाद - तब्बल 600 चोऱ्या आणि सात खुनांप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या एका कुख्यात गुन्हेरागाला हरियाणा पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. अटक आरोपी जगतार हा जगतार गँगचा म्होरक्या आहे. तो चोरी आणि लुटमारीतून मिळालेली रक्कम अय्याशीसाठी उडवत असल्याचे तसेच गुन्हा करण्याआधी कालीमातेचा जप करत असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. गुन्हेगारी आणि अय्याशी जीवन जगणारा जगतार रात्र दिल्लीतील रेड लाइट एरिया किंवा फऱीदाबादमधील कुठल्यातरी हॉटेलमध्ये घालवत असे, तर दिवसा मुसेसर भागातील फुटपाथ किंवा निवाऱ्यांमध्ये घालवत असे. विशेष म्हणजे जगतारने कधीही स्वत:साठी भाड्याने घर घेतले नाही, तसेच तो मोबाइलही वापरत नसे. जर कुणाशी संपर्क साधायचा झाल्यास तो सहकाऱ्यांचा मोबाइल वापरत असे. 42 वर्षीय जगतार हा अविवाहित असून, केवळ तिसरीपर्यंत शिकलेला आहे. 2005 साली त्याच्या नावावर पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. त्यानंतर अटक होईपर्यंत त्याच्यावर सात हत्या आणि 600 हून अधिक चोऱ्या आणि लुटमारी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला याआधीही अनेकदा अटक झाली होती. मात्र त्यावेळी तो सुटला. पोलिसी रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असलेला जगतारचा तंत्र-मंत्रावर विश्वास आहे. हत्या, लुटालूट, चोरी असे गुन्हे करण्यापूर्वी तो काली मातेच जप करत असे. त्याला असे करण्याचा सल्ला एका तांत्रिकाने दिला होता.
600 चोऱ्या, सात खुनांचे पाप, गुन्ह्याआधी करायचा कालीमातेचा जाप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 2:09 PM