सोलापूर/पंढरपूर : दाक्षिणात्य हिरो अल्लु अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट गाजल्यानंतर चंदन तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच, चंदन चोरीचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी सांगलीत रक्त चंदनाच्या तस्करीचा गुन्हा समोर आला होता. त्यानंतर, आता चंदन घेऊन निघालेले एक वाहन ताब्यात घेऊन ८ लाख २८ हजार रुपयांचे १३८ किलो चंदन व कार असा १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना पकडले आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार दोघे एका कारमधून पेनूर येथून पंढरपूरमार्गे चंदन घेऊन निघाल्याची माहिती पोलीस नाईक हनुमंत उर्फ समाधान भराटे यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ एक पथक नेमले. या पथकाने सापळा रचून एम. एच. ४२ / के. ७६११ क्रमांकाची कार पकडली. या कारमध्ये चार पोती भरलेले चंदनाचे लाकूड मिळून आले. कारचालक रमेश महादेव तेलंग (वय २५, रा. तुंगत, ता. पंढरपूर) व कचरूद्दीन अल्लामीन जमादार ( वय ३५, रा. पेनूर, ता. मोहोळ) हे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे चंदनाचे लाकूड कोठून आणले होते, कोठे नेण्यात येणार होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय अधिकारी विक्रम कदम व पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत ओलेकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन वसमाळे, प्रकाश मोरे, पंढरीनाथ गोदे, पोलीस नाईक विनायक यजगर, गजानन माळी, हनुमंत उर्फ समाधान भराटे, देवेंद्र सूर्यवंशी यांनी या कामगिरीत सहभाग नोंदविला.