लखनौ - उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातील जैतपूर भागातील बायपास मोहल्ला येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका विवाहितेने कथितपणे गळफास लावून आत्महत्या केली. पत्नीच्या अशाप्रकारे झालेल्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या पतीने अंत्यसंस्कारादरम्यान, तिच्या पेटत्या चितेमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखत त्याला बाहेर ओढले. तो किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार जैतपूरमधील रहिवासी असलेल्या बृजेश कुशवाहा याचा अकौना गावातील २३ वर्षीय उमा हिच्याशी २०१६ मध्ये झाला होता. गुरुवारी रात्री उमा हिचा मृतदेह बेडरूममध्ये पडलेल्या अवस्थेत सापडला होता. तिच्या गळ्यात ओढणीचा फास होता. त्यामुळे बृजेशच्या सासरच्या मंडळींनी त्याच्याविरोधात हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा आरोप लावला.
मृत उमा हिची आई तेज कुंवर हिने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवताना आरोप केला की, सुमारे आठवडाभरापूर्वी त्यांच्या मुलीला पैशांची मागणी करून मारहाण केली होती. त्यानंतर नातेवाईकांकडून ७० हजार रुपये जमवून ते जावई बृजेशला दिले होते.
दरम्यान, बृजेश याने हुंड्यासाठी पत्नीची हत्या केल्याचा आरोप खोटा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी कुलपहाड पोलीस ठाण्यातील नायब तहसीलदार पंकज गौतम यांनी जबाब नोंदवला. तसेच मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवला हो. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.