सोलापूर - सांगोला पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ममदाबाद-हुन्नुर (ता. मंगळवेढा) येथील कंटनेर चालकाच्या खूनप्रकरणाचा 24 तांसात छडा लावला. बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून त्याच गावातील दोघा सख्ख्या भावांनी तीन अनोळखीच्या तरुणांच्या मदतीने संजय भगवान चव्हाण (30 वर्षे) याचा डोक्यात दगड घालून खून केला. तत्पूर्वी त्याला शिवीगाळ करुन जबर मारहाणही करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक सुहास जगताप आणि तपास अधिकारी हेमंतकुमार काटकर यांनी याबाबत माहिती दिली.
अनिल जकाप्पा पुजारी (वय २८) व सुनील जकाप्पा पुजारी (वय २७, रा. ममदाबाद-हुन्नूर, ता. मंगळवेढा) असे खून प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, डीबी पथकातील पोलिसांनी खुनातील उर्वरित त्या तीन अनोळखी तरुणांना ताब्यात घेतले आहे. अज्ञात कारणावरून पाच ते सहा अनोळखी इसमांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कंटेनर चालक संजय चव्हाण याचे अपहरण करून कशानेतरी त्याच्या डोक्यात मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने अपघात झाल्याचा बनाव करून त्यास दगडामध्ये टाकून पसार झाले होते. ही घटना सोमवारी सकाळी १०च्या सुमारास उदनवाडी ते चोपडी (ता.सांगोला) जाणाऱ्या रोडलगत भारत वलेकर यांच्या शेताजवळ उघडकीस आली होती.
याबाबत भगवान बाबू चव्हाण (रा. महमदाबाद-हुन्नूर, ता. मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची वेगाने सूत्रे हलवली होती. मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे डीबी पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती.
तपास अधिकारी हेमंतकुमार काटकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ममदाबाद-हुन्नूर येथील अनिल जकाप्पा पुजारी (वय २८) व सुनील जकाप्पा पुजारी (वय २७), ऊस तोडणी मुकादम दत्ता गरांडे यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी संजय चव्हाण यांच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करून पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर, पोलीस नाईक राहुल कोरे, पोलीस नाईक अभिजित मोहोळकर, पोलीस नाईक दत्ता वजाळे, पोलीस नाईक सचिन वाघ, पोलीस नाईक सिद्धनाथ शिंदे यांनी केली आहे.
मयत संजय चव्हाण हा कंटेनरवर चालक म्हणून काम करीत होता, त्याने सुमारे दीड वर्षापूर्वी अनिल व सुनील पुजारी याच्या बहिणीला पळवून नेले होते. त्यानंतर संजय चव्हाण हा दोघा भावांना फोन करून तुमच्या बहिणीला पळवून नेले, तुम्ही माझी काय वाकडे केले असे म्हणून त्यांची खुन्नस काढत होता. त्याच्या बोलण्याचा राग मनात धरून दोघे भाऊ त्याचा कायमचा काटा काढण्याची संधी शोधत होते. दरम्यान, संजय चव्हाण हा (नेज, ता. हातकणंगले) जवाहर सहकारी साखर कारखान्यावरील टोळीतील एका महिलेच्या प्रेमात पडल्याने तिच्या सोबत राहत होता. याबाबत अनिल व सुनीलच्या नेजमधील मित्रांनी त्यास सांगितले.
त्यानुसार दोघे भाऊ दुचाकीवरून रविवारी रात्री १२ च्या सुमारास सदर ठिकाणी गेले, त्यांनी त्यास त्याठिकाणी शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्या दुचाकीवर बसवून तेथून मिरज मार्गे ममदाबाद-हुन्नूर गावाकडे घेऊन निघाले होते. त्यांची दुचाकी सांगोला तालुक्यातील उदनवाडी शिवारात आली. वाटेत सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास उजडू लागल्याने त्यांनी त्यास उदनवाडी-चोपडी जाणाऱ्या रोडवरील भारत वलेकर शेताजवळ रस्त्यालगत नेऊन अपघात झाल्याचा बनाव करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व त्यास दगडामध्ये फेकून निघून गेले असे पोलिसांच्या तपासात त्यांनी सांगितले.