- जितेंद्र कालेकर ठाणे : आफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस ऊर्फ किंग (सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई) याच्यापाठाेपाठ त्याचाच आणखी एक साथीदार चुकवू फिलीप गाॅड विन ऊर्फ क्रेझ यालाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या ताब्यातून पाच लाख ६० हजारांचे १४ ग्रॅम कोकेन आणि राेकड असा पाच लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दाेघांकडून आतापर्यंत ११६ ग्रॅम वजनाचे ४६ लाख ४० हजारांचे काेकेन जप्त केले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर भागातील हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल, येथे कोकेन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या कोफी याला वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विकास घाेडके, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि अविनाश महाजन, आदींच्या पथकाने ३ ऑगस्टला सापळा लावून अटक केली. त्याच्या ताब्यातून सुरुवातीला २४ लाखांचे ६० ग्रॅम काेकेन त्यानंतर २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन जप्त केले हाेते. त्याच्याकडून आतापर्यंत ४६ लाख ८० हजारांचे कोकेन हस्तगत केले आहे. दरम्यान, त्याच्याच सखाेल चाैकशीत त्याचा साथीदार क्रेझ याचे नाव समाेर आले. त्यालाही ठाण्यातून या पथकाने १० ऑगस्टला रात्री आठ वाजता अटक केली. या दाेघांकडून आतापर्यंत ११६ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ४० हजारांचे काेकेन, सहा हजार ४२० रुपयांचा माेबाईल आणि काही राेकड असा ४६ लाख ४६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. क्रेझ याला १६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.