बंगळुरू - कर्नाटकमधील वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची काल एका हॉटेलमध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती गुरुजींची भेटण्यासाठी वाट पाहत होते. गुरुजी आले तेव्हा हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना नमस्कार केला. त्यानंतर चाकूने गुरुजींवर हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोरानेही त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुजींच्या हत्येनंतर काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मंजुनाथ मारेवाड आणि महांतेश अशी या दोन आरोपींची नावं आहेत. दरम्यान, आरोपींच्या अधिक चौकशीमधून चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या का झाली याची नेमकी माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, कुणीतरी चंद्रशेखर गुरुजींना फोन करून हॉटेलच्या लॉबीमध्ये येण्यास सांगितले. लॉबीमध्ये आल्यावर तिथे असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी विजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे.
या प्रकरणी तपासासाठी ५ पथकांची नियुक्ती केली आहे. एसीपी लेव्हलचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर नेमके कारण समोर येईल.
तीन दिवसांपूर्वी गुरुजींच्या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानिमित्त आयोजित शोकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुरुजी येथे आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, गुरुजींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यांनी हे हत्याकांड क्रूर आणि दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.