नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपापसातील वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर थेट बॉम्बने हल्ला केला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. वादाच्या वेळी घटनास्थळी लोक जमा झाले होते, त्याचवेळी एका तरुणाने तिथे बॉम्ब फेकला आणि मोठा स्फोट झाला. सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सर्व जखमींना महू येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरजवळील महूमधील बडगोंड पोलीस स्टेशन हद्दीतील बेरछा गावातील ही भयंकर घटना घडली आहे. काही लोक ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची तयारी करत होते. याच दरम्यान काही जण दारू प्यायले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. हे पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमली. या भांडणादरम्यानच एका तरुणाने लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये पडलेला बॉम्ब उचलला आणि गर्दी जमलेल्या ठिकाणी फेकला. यामुळे त्याठिकाणी मोठा स्फोट झाला.
बॉम्ब फोडणाऱ्यासह दोन जणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर जवळपास 15 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये सात महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. बेरछा गाव आर्मी फायरिंग रेंजजवळ आहे. डिफेक्टिव बॉम्ब फायरिंग रेंजमध्येच ठेवले जातात. हे बॉम्ब गावातील लोक घेऊन जातात. गावकरी या बॉम्बमधून पितळ काढून ते विकतात.
एक बॉम्ब उचलून तरुणाने गर्दीमध्ये फेकला. ज्यामुळे तिथे स्फोट झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एएसपी शशिकांत कांकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींमध्ये अंतर्गत वाद होता. वाद वाढल्यानंतर एका तरुणाने बॉम्ब फेकला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींची परिस्थिती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.