आसाम मधील दिमा हसाओ येथून इंडियन आर्मीच्या मेजरला आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. या दाम्पत्यावर आपल्या घरातील अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित मोलकरीण मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. या मोलकरणीला एवढी मारहाण करण्यात आली आहे की, तिचे दात आणि नाकाचे हाडही तुटले आहेत. एवढेच नाही तर, तिच्या शरिरावर भाजल्याच्या खुणाही आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलीस सुत्रांनी म्हटले आहे की, संबंधित 16 वर्षीय मोलकरणीच्या जीभेवर कापल्याच्या खुणा आहेत. तसेच तिला जास्तित जास्त वेळ विवस्रच ठेवले जात होते.
कचऱ्यातलं अन्न दिलं, रक्त चाटायलाही भाग पाडलं - माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित अल्पवयीन मोलकरणीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आहेत. संबंधित ताम्पत्य तिला गेल्या 6 महिन्यांपासून त्रास देत होते. तिला केवळ मारहाणच केली गेली नाही, तर काही दिवस उपाशीही ठेवले गेले. ती जेव्हा जेवण मागत होती, तेव्हा तिला कचऱ्यातील अन्न दिले जात होते. एवढेच नाही, तर हे दाम्पत्य तिला विवस्त्र करून रक्त निघेपर्यंत मारहाण करत होते. कळस म्हणजे, तिला तिचेच रक्त चाटण्यासाठीही भाग पाडले जात होते, असे पीडितेने म्हटले आहे.
POCSO कायद्यांन्वये गुन्हा दाखल -यासंदर्भात पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पीडिता पायऱ्यांवरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी मारहाण आणि बेकायदेशीर मजुरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेजरने पीडितेला हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथून आणले होते. मेजर तेथेच तैनात आहे. पीडितेने आसाममध्ये आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.