नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. ऑन ड्युटी असलेल्या एका जवानाने पत्नीला व्हि़डीओ कॉल करून सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडत आयुष्य संपवलं. पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील अंगावर रॉकेट ओतून पेटवून घेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिहारमधील आरा येथे ही भयंकर घटना घडली धक्कादायक म्हणजे या घटनेची माहिती मिळताच मोठ्या दीराला देखील हार्ट अटॅक आला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी पाटणा पीएमसीएचला नेण्याचा सल्ला दिला आहे. भाऊ-वहिनीबाबत समजताच मोठा दिराला खूप मोठा धक्का बसला. हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. बिहारमधील आरा येथे उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पियनिया गावात या घटना घडल्या आहेत.
महेश सिंह असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव होतं. तो हैदराबाद 16 बिहार रेजिमेंटमध्ये नायक पदावर तैनात होता. त्याच्या पत्नीचं नाव गुडिया देवी आहे. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेशचा मोठा भाऊ जयनाथ सिंह याला हार्ट अटॅक आला. त्याच्यावर पाटण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय, पती-पत्नीमध्ये कुठल्या कारणावरुन वाद झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास महेशने बायकोला व्हिडीओ कॉल केला होता. थोडा वेळ दोघांमध्ये बोलणंही झालं, मात्र अचानक सर्व चित्र बदललं. नवऱ्याने सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडल्याचं पाहून तिनेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. महेश काही दिवसांपासून तणावात होता. गुडिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, असंही सांगितलं जात आहे. महेश-गुडिया यांना 15 वर्षांची मुलगी, तर 14 आणि 12 वर्षांची दोन मुलं आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.