- संतोष वानखडे वाशिम - पेट्रोलिंग करीत असताना एका कंटेनरमध्ये सुगंधित तंबाखूचा वास आल्याने, मालेगाव पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास कंटेनर थांबवून तपासणी केली. यावेळी १४ लाख ७६ हजार रुपये किंमतीची प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू आढळून आल्याने कंटेनर चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.
नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला आहे. मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बायपासवरून पीबी -१३ एआर-९४६३ क्रमांकाचे कंटेनर वाशिमकडे जात असताना पथकाने आढळून आले. सुगंधित तंबाखूचा वास आल्याने कंटेनर थांबवून तपासणी असता, १४ लाख ७६ हजार रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू ५३६ पोत्यांमध्ये भरलेली (वजन अंदाजे १४,७६० किलो) आढळून आली. तंबाखूजन्य पदार्थ बनविण्यासाठी उपयोगात येणारा लिक्विड पॅराफिन नावाचे रासायनिक द्रावण अंदाजे किंमत ८० हजार रुपये व कंटेनर अंदाजे किंमत २५ लाख रुपये असा एकूण ४० लाख ५६ हजारांचा मुद्देमाल मालेगाव पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यात घेतला. चालकास नाव व पत्ता विचारला असता, मुबारक अकबर, (वय २६) रा.सुडाका, हरयाणा असे सांगितले. चालकास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला.