नवी दिल्ली - ऑनलाईन गेम खेळायला सर्वांनाच आवडतं. सध्या तरुणाईमध्ये लुडो गेमची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण लुडो खेळणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळ म्हटला की त्यामध्ये यश-अपयश येत असतं. मात्र अनेकदा अपयश सहन न झाल्याने मुलं गुन्हेगारीकडे वळतात. अशीच एक घटना आसामच्या उत्तरेकडील लखीमपूर जिल्ह्यातील मोइदुमिया येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभात 20 वर्षीय तरुणाची त्याच्याच एका मित्राने लुडो खेळताना चाकू मारून हत्या केली. इस्सद अली नावाच्या पीडित तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
रिपोर्टनुसार, अली आणि आरोपी अफजात अलीसोबत पाच जण लुडो गेम खेळत होते. काही वेळाने इस्सदसोबत खेळावरुन भांडण झालं. अलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. याच दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असून नेमकं काय घडलं याचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.