कोलकाता - पश्चिम बंगालमधीलभाजपा नेते मनीष शुक्ला यांची अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली. राज्यातील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागढ पोलीस ठाण्यासमोरच हे हत्याकांड घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसराला छावणीचे रुप प्राप्त झाले आहे. तसेच, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनीष शुक्ला यांच्या हत्येनंतर भाजपा नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचे आवाहन केले असून राज्यपालांनीही याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी, राज्यपाल जयदीप धनखड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना राजभवन येथे बोलावले आहे.
मनीष शुक्ला हे रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास टीटागढ पोलीस ठाण्यासमोरील आपल्या भाजपा कार्यालयात बसले होते. त्याचदरम्यान, येथे दुचाकीवर आलेल्या अज्ञांतांनी शुक्ला यांच्या गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुक्ला यांना तात्काळ बॅरेकपूरच्या बी.एन. हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत खालवल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, येथील डॉक्टर्संने मनीष शुक्ला यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात मनीष यांचा मृत्यू झाला असून आणखी एक गंभीर जखमी आहे.
सीबीआय तपासाची मागणी
मनिष शुक्ला यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे. पश्चिम बंगाल भाजपाचे सरचिटणीस संजय सिंह यांनी या हत्याप्रकरणावर राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, बॅरेकपूर येथे 12 तासांचा बंद पुकारण्यात येणार असल्याची घोषणाही सिंह यांनी केली आहे.