नवी मुंबई - मोलकरणीला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री सीबीडी येथील आंबेडकर नगर परिसरात हा प्रकार घडला. मोलकरणीने वाढीव कामाला नकार देत काम सोडल्याने तिच्यावर राग असतानाच तिच्या मुलाकडून चुकीने फोन लागल्याच्या कारणातून हा प्रकार घडला.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांची पत्नी ऋचा पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. संदीप पाटील हे नेरुळ पोलीस ठाण्यात कार्यरत असून सीबीडी येथील पोलीस वसाहतीमध्ये रहायला आहेत. तर त्यांची पत्नी ऋचा पाटील ह्यांची यूपीएससीची परीक्षा देऊन आयपीएस होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेने वाढीव कामाला नकार दिला होता. यावरून त्या मोलकरणीला इतर ठिकाणचे काम देखील गमवावे लागले होते. अशातच पाटील यांच्या घरीही महिना ८०० रुपये पगारात सर्वच कामे मोलकरणीकडून सक्तीने करून घेतली जात होती. यामुळे सहा महिन्यांपूर्वी त्यांनी संदीप पाटील त्यांच्याकडची नोकरी सोडली होती.
परंतु सोमवारी मोलकरणीच्या मुलाकडून घरातील मोबाईलवरून नकळत संदीप पाटील यांना फोन लागला. यावरून त्यांनी फोन करून गलिच्छ शिवीगाळ केली. शिवाय रात्री आंबेडकर नगर येथे जाऊन मोलकरणीसह तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन या दांपत्याच्या तावडीतून मोलकरीण व तिच्या पतीची सुटका केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सहायक निरीक्षक संदीप पाटील व पत्नी ऋचा पाटील विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.