राजस्थानमधील बाडमेर मधील एका आरटीआय कार्यकर्त्यासोबत (RTI Activist) तालिबानी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी गुंडांनी पहिले आरटीआय कार्यकर्त्याचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्याचे हात पाय तोडले. यानंतरही ते थांबले नाहीत. त्या व्यक्तीला यातना देत त्यांनी त्याच्या पायामध्ये लोखंडी सळ्या आणि खिळेही ठोकले. पीडित व्यक्तीनं ग्राम पंचायतीमध्ये भ्रष्टाचार आणि अवैध दारू विक्रीची तक्रार केली होती असं सांगण्यात येत आहे.
जोसोडो की बेरी येथील रहिवासी असलेल्या अमराराम गोदारा (३०) यांच्यावर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भ्रष्टाचार आणि अवैध दारू विक्रीच्या तक्रारीनंतर गुंडांनी अमराराम यांचं अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. जोधपूरहून घरी परतणाऱ्या अमराराम यांना बसमधून उतरताना आठ मुखवटाधारी हल्लेखोरांनी कारमधून उचलून नेलं.यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. पहिल्यांदा त्यांच्या दोन्ही पायांवर लोखंडी सळ्यांनी वार करण्यात आले. त्यानंतर त्यांना आणखी वेदना देण्यासाठी पायात सळ्या आणि खिळेदेखील ठोकले. त्यानंतर दोन्ही पायावर सहा ठिकाणी रॉड आणि खिळे ठोकले. यामध्ये त्यांच्या हातांनाही दुखापत करण्यात आली. अनेक तास त्यांच्यावर अत्याचार केल्यानंतर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू होईल या विचाराने त्यांना आरोपींनी रस्त्यावर फेकून दिले.
चार टीम्सकडून तपासरस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत एक व्यक्ती पडल्याची सूचना लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अमराराम यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी दिली. पोलिसांनी याविरोधात गुन्हहा दाखल केला असून चार टीम याचा तपास करत आहेत.