झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पलामूमध्ये मोहम्मद तौहीद आलम यांच्यावर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात आता मोठा खुलासा करण्यात आला आहे. मोहम्मद यांची पत्नी, भाचा यांच्याशिवाय आणखी चार जणांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी तौहीदला लागलेली गोळी आणि चार मोबाईल जप्त केले आहेत. भाच्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या मामीनेच आपल्या नवऱ्याचा काटा काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्टच्या रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. मोहम्मद तौहीद आलम यांची पत्नी गौशिया परवीन आणि त्यांचा भाचा मोहम्मद इर्शाद यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यांचे कॉल डिटेल्स तपासले असता दोघांमध्ये तब्बल 1 हजार 40 वेळा Whatsapp कॉल्स झाल्याचे आढळून आले. मामी आणि भाचा यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मोहम्मद तौहीद यांनाही होती. तौहीद यांनी दोघांना अनेकदा विरोध केला होता. तौहीद आणि गौशिया यांना 12 ते 14 वर्ष वयोगटातील दोन मुलं आहेत.
तौहीदला मारण्यासाठी 8 महिन्यांपूर्वी दिलेली सुपारी
सततच्या विरोधाला कंटाळून भाचा इर्शाद आणि मामी गौशिया यांनी मिळून तौहीदचा काटा काढण्याची योजना आखली. यामध्ये मोहम्मद आरजू, जुमन, मंजर आणि बिलाल यांनाही सहभागी करुन घेण्यात आलं. तौहीदची हत्या करण्यासाठी इर्शादने साडेतीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. बुलेट खरेदी करण्यासाठी कर्ज म्हणून घेतलेले पैसे इर्शादला सुपारीसाठी द्यावे लागले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तौहीदला मारण्यासाठी 8 महिन्यांपूर्वी सुपारी देण्यात आली होती.
पैसे घेऊनही आरजू, जुमन, मंजर आणि बिलाल काम करत नव्हते. त्यामुळे इर्शाद पैसे परत मागत होता. अखेर सर्व जण तौहीद यांना मारण्यास तयार झाले.17 ऑगस्टच्या रात्री दुकानातून घरी जाण्यासाठी मोहम्मद तौहीद निघाले. ट्रेनिंग स्कूलजवळ दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तौहीद यांच्यावर मागून गोळ्या झाडल्या. पाठीत गोळी लागल्यानंतरही तौहीद घरी गेले, तिथून उपचारासाठी ते एमआरएमसीएचमध्ये दाखल झाले आणि नंतर शहरातील खासगी रुग्णालयात त्यांनी पुढील उपचार घेतले. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.