नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या अनूपपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने स्वतःला पेटवून घेत थेट पोलीस ठाण्यात प्रवेश केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान दाखवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच रिक्षाचालकाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या रिक्षाचालकाने पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आपल्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत, असं सांगत त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच आपण हे कृत्य केल्याचं त्याने म्हटलं आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून रिक्षाचालक या घटनेत भाजला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या अनूपपूरमध्ये राहणारे 50 वर्षीय मुरारी लाल शिवहरे हे रिक्षाचालक आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा रिक्षातील तीन ग्राहकांशी वाद झाला होता. 9 सप्टेंबर रोजी प्रकाश शुक्ला, शिवम उपाध्याय आणि दुर्गेश चौधरी यांच्यासोबत भांडण झालं होतं. या वादानंतर ग्राहकांनी आपल्या खिशातील पैसे चोरून आपल्याला लुबाडल्याची तक्रार शिवहरे यांनी पोलीस ठाण्यात केली होती. आपल्या तक्रारीची कुठलीही दखल घेण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे.
लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला पेटवून घेतलं
दुसऱ्या दिवशी तक्रार नोंदवल्याबद्दल मुरारी लाल यांच्या देखील मुलाला मारहाण करण्यात आली. मुलाला घेऊन ते पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा मारहाणीची तक्रारही पोलिसांनी नोंदवून घेतली. पोलीस तक्रार नोंदवूनही काही कारवाई करत नसल्यामुळे आरोपींचं धाडस अधिकच वाढत असल्याचं मुरारी लाल यांनी म्हटलं आहे. पोलीस लक्षच देत नसल्यामुळे त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला पेटवून घेतलं. रिक्षात बसून स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून स्वतःला आग लावली असं म्हटलं आहे.
पेटती व्यक्ती पोलीस ठाण्यात घुसल्याचं पाहून उपस्थितांमध्ये गोंधळ
आग लागल्यानंतर ते धावतच पोलीस ठाण्यात घुसले. पेटती व्यक्ती पोलीस ठाण्यात घुसल्याचं पाहून उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. यामध्ये ते 60 टक्के भाजले गेले. मुरारी लाल शिवहरे यांच्या मुलाला झालेल्या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी केलेल्या लुटमारीच्या आरोपाचे कुठलेही पुरावे नसल्यामुळे ती कलमं लावण्यात आली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.