मुंबई: वांद्रे पश्चिमच्या पाली हिल येथील १४५ वांद्रे कॅफे आणि बारमध्ये शनिवारी एका अल्पवयीन मुलाने ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होत आहे. ही संपूर्ण घटना कॅफे आणि बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यात महिलेने विनयभंग करणाऱ्याला चापट मारली आणि बार व्यवस्थापनाकडे तक्रार केली. ही महिला व्यावसायिक डिजिटल चित्रकार असून बंगळुरूची रहिवासी आहे.
पीडितेने संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आणि आरोपीला पकडण्यासाठी मदत मागितली. पीडित महिलेने पत्रकारांना सांगितले की, मी मुंबईत माझ्या मित्राच्या साखरपुडा समारंभाला कुटुंबासोबत सहभागी होण्यासाठी आले होते. तो उरकल्यानंतर शनिवारी आम्ही कुटुंबाने १४५ वांद्रे पबमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही डान्स फ्लोअरवर नाचत असताना अनोळखी मुलगा माझ्या जवळ आला आणि तो मला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. गर्दीचा फायदा घेत त्याने माझ्या गुप्तांगालाही स्पर्श केला. तेव्हा मी त्याचा हात पकडला आणि त्याला दूर लोटले. तो खूप मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची चूक त्याच्या मित्रांच्या लक्षात आली आणि काहींनी माफी मागितली. मात्र पब व्यवस्थापन याबाबत उदासीन होते. त्यांनी त्या मुलाला बारमधून बाहेर काढले नाही.
एक बाऊन्सर वगळता बार व्यवस्थापनातील कोणीही आमच्याशी बोलले नाही. उलट आम्हाला तिथून दूर जाण्यास सांगण्यात आले. मात्र तो मुलगा आणि त्याच्या मित्रांना तिथेच राहण्याची परवानगी देण्यात आली. महिलेने हा प्रकार इन्स्टाग्रामवर पोस्ट करत मुंबई पोलिसांना टॅग केल्यानंतर १४५ वांद्रे पब व्यवस्थापनाने माफी मागितली आणि महिलेला मदत करण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार पहाटे फ्लाइटने बंगळुरूला तिच्या घरी परतली. मात्र तिने मुंबई पोलिसांना कळवले नाही कारण तिची फ्लाइट बुक झाली होती. मात्र आरोपीला अटक व्हावी आधी इच्छा तिने व्यक्त करत पोलिसाना त्यासाठी सहकार्य करण्याचेही कबूल केले आहे.