- बलवंत तक्षक
चंदीगड : ॲक्सिस बँकेच्या येथील (सेक्टर ३१) मुख्य शाखेचा मुख्य सुरक्षारक्षक सुनील हा ४.०४ कोटी रुपये घेऊन पळून गेला आहे. तीन वर्षांपासून तो बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. त्याने पंजाबमधील मोहाली आणि हरयाणाताल मोरनी येथील पत्ते दिले होते. त्याला पकडण्याच्या मोहिमेवर पोलीस असले तरी त्याने त्याचा मोबाइल बंद करून ठेवला आहे.पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यात सुनील बँकेच्या आत जाऊन थोड्या वेळाने बाहेर येत होता, असे वारंवार झाल्याचे दिसते. तो बाहेर येऊन शर्टच्या आत लपवलेल्या नोटांची बंडले कोण्या परिचिताला देत होता किंवा कोणत्या तरी वाहनात ठेवत होता, असे पोलिसांना वाटते. हे घडत होते तेव्हा पंजाब पोलिसांचे तीन जवानही तेथे कर्तव्यावर होते; परंतु त्यांनाही या गोष्टीचा पत्ता लागला नाही. रात्री जवळपास तीन वाजता सुनील गायब झाल्यावर पोलिसांच्या जवानांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी तेथे ठेवलेल्या खोक्यांची तपासणी केली तेव्हा कटरने कुलूप तोडून त्यात ठेवलेली रक्कम काढल्याचे दिसले. हिशेब केल्यावर सुनीलने ४.०४ कोटी रुपये घेऊन पळ काढला, असे स्पष्ट झाले.
पोलिसांची पथके स्थापनचंदीगडच्या पोलीस अधीक्षक (दक्षिण) श्रुती अरोरा यांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी छापे मारले आहेत, असे सांगितले. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या मोबाइलचे लोकेशन शोधले जात आहे. त्याला लवकरच अटक करू, असा विश्वास अरोरा यांनी व्यक्त केला.
अनेक राज्यांत या शाखेतून जायचा पैसाॲक्सिस बँकेच्या या शाखेतून चंदीगडशिवाय पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या शाखांतही पैसा पाठवला जायचा. या शाखेत प्रत्येक वेळी कोट्यवधी रुपये रोख असायचे. मुख्य सुरक्षा कर्मचारीच एका दिवशी कोट्यवधी रुपये घेऊन निघून जाईल, असा संशयही बँक अधिकाऱ्यांना आला नाही.