लखनौ - उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे लग्न लागण्यापूर्वी एका वधुने तिच्या वडिलांची रवानगी तुरुंगात केल्याची घटना घडली आहे. वधूचे वडील मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून देण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी वरपक्षाकडून १ लाख रुपये घेतले होते. मात्र लग्न लागण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. या प्रकरणात मथुरा पोलिसांनी वधूच्या वडिलांसह तिचा होणारा नवरा आणि अन्य तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक केली आहे. मात्र नवरदेव फरार आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, १९ वर्षिय तरुणीने तिचे वडील एक लाख रुपये घेऊन तिचं जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याची माहिती काही नातेवाईकांना दिली होती. त्यानंतर सदर मुलीच्या नातेवाईकांनी पाच जणांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मुलीच्या वडिलांनी वर पक्षाकडून एक लाख रुपये घेत हे लग्न निश्चित केलं होतं.
या सर्वांविरोधात हायवे पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ३६६,कलम ३२३ आणि ५०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार जेव्हा तरुणीने रवी चौधरी नावाच्या तरुणासोबत लग्न करण्यास नकार दिला तेव्हा तिच्या वडिलांनी शिविगाळ करून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली. मात्र ज्याच्याशी लग्न ठरवले होते, तो वर मात्र फरार झाला. मुख्य आरोपीला अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे, असे हायवे पोलीस ठाण्याचे एसएचओ अजय कौशल यांनी सांगितले.