पुणे - नाताळाच्या सुट्ट्या लागल्या असनू नाताळ आणि वर्षा अखेरनिमित्त अनेकजण पिकनिक आणि पर्यटनाचा प्लॅन आखतात. सुट्टीच्या निमित्ताने कुटुंब सहलींचंही नियोजन केलं जातं. मात्र, घर सोडताना बंद घराची नीटनिटकेपणे काळजी घ्यायला हवी, अन्यथा आपलं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. पुण्यातील एक कुटुंब ख्रिसमस साजरा करण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी घरात दरोडा टाकून सोन्याच्या दागिन्यांसह २५ लाखांचा ऐवज लंपास केला. पुण्यातील महंमदवाडी येथे ही घटना घडली असून कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील मंहमदवाडी परिसरातील एक कुटुंब ख्रिसमिस सणानिमित्त सेलिब्रेशनसाठी जवळील चर्चमध्ये गेले होते. रात्री ९ च्या सुमारात ते घरातून बाहेर पडले. त्यावेळी, चोरट्यांनी पाळत ठेऊन संबंधित कुटुंबीयांच्या घरात लोखंडी सळ्या तोडून प्रवेश केला. यावेळी, घरातील सोने-चांदीचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. मध्यरात्री सेलिब्रेशनहून परत आल्यानंतर कुटुंबीयांना घरातील अवस्था पाहून धक्काच बसला. त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी केली असताना हिऱ्यांचे, सोने-चांदीचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, संबंधितांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन सदरील चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरीचा तपास लावण्यास सुरुवात केली आहे. या चोरट्यांनी खिडक्या्ंच्या जाळ्या आणि सळया तोडून घरात प्रवेश केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, लवकरच चोरट्यांना जेरबंद करू, असेही पोलिसांनी म्हटले आहे.