नवी दिल्ली - बिहारच्या खाण विभागाचे उपसंचालक (Deputy Director Mining Department) सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) छापा टाकला. यामध्ये अधिकाऱ्याच्या घरी तब्बल 89 लाखांचं घबाड सापडलं आहे. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली. आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबादसह पाटणा येथील तीन ठिकाणी ही कारवाई केली आहे. आतापर्यंत या कारवाईत 89 लाख 88 हजारांहून अधिक संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून अधिक तपास करण्यात येत आहे. अधिकाऱ्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्य़ा. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा येथील रुपसपूर परिसरातील निवासस्थानासोबतच विकास भवन येथील कार्यालयावर देखील आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने छापेमारी केली आहे. कारवाईमध्ये विविध गोष्टींची माहिती समोर आली आहे. सुरेंद्र कुमार सिन्हा याची 2006 मध्ये खाण विभागात अधिकारी म्हणून पोस्टिंग झाली होती. बेहिशोबी मालमत्ता असल्याचं देखील समोर आलं आहे. याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरेंद्र कुमार सिन्हावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेंद्र कुमार सिन्हाची कसून चौकशी
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेतीचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक तसेच अवैध बांधकामांना आळा घालण्यात येत आहे. खाण विभागाचे उपसंचालक सुरेंद्र कुमार सिन्हाची कसून चौकशी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली होती. ओडिशामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलं होतं. दक्षता विभागाने सुंदरगड अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी बिस्वजित मोहापात्रा यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता आढळली.
एक दुमजली इमारत, फ्लॅट, 10 भूखंड आणि 2 कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी
ओडिशा दक्षता विभागाने 3 लाख रुपये, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आणि इतर स्थावर मालमत्ता शोधून काढल्या. दक्षता विभागाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, भुवनेश्वरमध्ये एक दुमजली इमारत आणि एक फ्लॅट, 10 भूखंड आणि 2 कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी, विमा आणि इतर गोष्टी सापडल्या आहे. छापेमारीत 3 लाखांहून अधिक रोख आणि 350 ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. तसेच म्युचल फंडमध्ये 18 लाख गुंतवले आहेत. याशिवाय मोहपात्रा यांनी नुकताच भुवनेश्वरमधील बलियंता येथे त्यांच्या पत्नीच्या नावाने सिमेंटचा व्यवसाय सुरू केला होता.