मीरारोड - काशीमीरा भागातील भाजपा नगरसेवकाचे वडील व भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या केसरीनाथ म्हात्रे याने त्याच्या मालकीची नसताना देखील पूर्वीची गावठाणची जमीन तब्बल चार जणांना विकून ३ कोटी ४२ लाखांना चुना लावल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे . म्हात्रे याना १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने ठोठावली आहे.
मुलुंडला राहणारे विकासक सत्येंद्र विश्वकर्मा सह राजेश चोपडा, भरत दुवा ह्यांनी मिळून सत्यदिप रिअलटर्स प्रा.लि नावाची बांधकाम कंपनी सुरु केली. ऑगस्ट २०१५ मध्ये केसरीनाथ म्हात्रे यांनी त्यांच्या आदर्श शाळे समोरील सिटीएस क्रमांक २ ( मालमत्ता क्रं. ६६ ) ४७५८ चौ.मी. ही मोकळी जागा स्वतःच्या मालकीची असून विकसित करण्यास द्यायची असल्याचे सांगितले . जमिनीचे भूमापन झाले नाही पण तलाठी कडे नाव नोंदवण्यासाठी अर्ज केला असून लवकरच नाव नोंद होईल असे सांगून केसरीनाथ याने ऑक्टोबर २०१५ साली विकास करारनामा करून जमीनीचा ७० लाखांना व्यवहार केला.
परंतु २०१७ साली केसरीनाथ ह्याने स्वतःच विश्वकर्मा ह्यांना तुमचे ७० लाख परत करतो व आपण केलेला करारनामा रद्द करू सांगितले . त्यानुसार करारनामा रद्द करण्यात येऊन ७० लाखांच्या बदल्यात १ कोटी १० लाख रुपयांचा धनादेश देऊन तसा करारनामा केसरीनाथ याने करून दिला . परंतु धनादेश वटला नाही आणि केसरीनाथ याने पैसे सुद्धा दिले नाहीत.
फसवणूक झालेल्या विश्वकर्मा यांनी पोलीस आयुक्तां कडे तक्रार केली होती . दरम्यान केसरीनाथ ह्याने आणखी तिघांना सुद्धा तीच जमीन विकासासाठी देतो सांगून पैसे घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले . अखेर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पवार व त्यांच्या पथकाने केसरीनाथ म्हात्रे याला अटक केली . ठाणे न्यायालयाने त्याला १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . केसरीनाथ म्हात्रे याने सदरची जमीन व्यव्हारा पोटी ह्या आधी देखील धरमलाल जैन यांची ८० लाख रुपयांना , अब्दुल वाहिद खान ह्यांची ७० लाख रुपयांना तर राय यांची १ कोटी ३ लाख रुपयांना फसवणूक केली आहे .
म्हात्रे हा पूर्वी पासून भाजपाचा कार्यकर्ता असून त्याचा मुलगा सचिन म्हात्रे हे भाजपचे सध्या काशीमीरा परिसरातील नगरसेवक आहेत . केसरीनाथ याने सदर परिसरात शासकीय आणि गावठाणच्या जमिनी बेकायदा कब्जा करून अनधिकृत बांधकामे केली असल्याचे आरोप आहेत .