भोपाळ - मध्य प्रदेशमधील जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका इसमाने छिंदवाडा येथील महिलेकडून एक कोटी रुपयांहून अधिकची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. या आरोपीने सुरुवातीला महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिचे शोषण केले. तसेच अश्लिल फोटो, व्हिडिओ आणि एमएमएस तयार केले. हे एमएमएस व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने ब्लॅकमेल केले. अखेर या पीडित महिलेने जेव्हा पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने तिच्या कुवेतमध्ये राहणाऱ्या भावाला व्हिडिओ पाठवला आणि तिला सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान, या त्रासाला वैतागून पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव मनीष श्रीवास्तव आहे. तो जबलपूरच्या दक्षिण सिव्हिल लाईनमध्ये राहतो. मनीषने छिंडवाडामध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेसोबत मैत्री केली. तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी प्रेमाचे नाटक करून महिलेचे शारीरिक शोषण केले. तसेच महिलेचे अश्लिल व्हिडीओ आणि एमएमएसही तयार केले.
जेव्हा आरोपीला वाटले की अश्लिल व्हिडीओ आणि एमएमएस पुरेसे आहेत, तेव्हा त्याने सदर महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली. एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिल्यानंतर जेव्हा महिलेने अजून पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपीने भोपाळमध्ये राहणाऱ्या आपल्या कुलभूषण नावाच्या मित्राशी संपर्क साधला. कुलभूषणने आपण आयबीचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच सदर महिलेच्या पतीला आश्लिल व्हिडीओ आणि एमएमएस दाखवण्याची धमकी दिली. असे करून त्यांनी महिलेकडून सुमारे एक कोटी ३० लाख रुपये उकळले.
दरम्यान, हे पैसे संपले तेव्हा आरोपींनी महिलेला पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपींकडून सुरू असलेल्या तगाद्यामुळे वैतागलेल्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सांगितले की, महिलेचा विवाह नागपूरमधील एका व्यक्तीसोबत झाला होता. मात्र ती छिंडवाडा येथे माहेरी राहायची. यादरम्यान, मनीष श्रीवास्तव याच्याशी तिची जवळीक वाढली. मनीष आणि त्याचा मित्र कुलभूषणने २०२० पासून आतापर्यंत त्यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपये उकळले. दरम्यान, पोलिसांनी या दोघांविरोधात ३७६, ३८६, ४२९, ५०६ कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.