नवी दिल्ली - हुंडयापायी एक तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. कारसाठी सासरची मंडळी हैवान झाल्याची घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे आधी हुंडा नको असं म्हणत लग्न केलं पण नंतर नवरदेवाने आपल खरं रूप दाखवलं. दीड वर्षांनी आईवडिलांना आता आपल्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. झारखंडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील धनबाद परिसरात राहणाऱ्या मोहम्मद मोईन अन्सारी यांची कन्या मंजूम आरा हिचं लग्न मोहम्मद रियाजुद्दीन अन्सारी याच्याशी लावून दिलं होतं.
लग्नाची बोलणी करताना आपल्याला हुंड्याची कोणतीही अपेक्षा नसल्याचं वरपक्षाने म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात लग्नाच्या दिवशी मात्र त्यांनी अल्टो गाडीची मागणी केली. ही मागणी तातडीने पूर्ण करणं मुलीच्या वडिलांना शक्य झालं नाही. त्यामुळे लग्नाच्या दिवसापासूनच त्यांच्या लेकीचा छळ सुरू झाला होता. मुलीने तिच्या माहेरी जाऊन चारचाकी गाडी घेऊन यावी, यासाठी सासरची मंडळी तिला त्रास देऊ लागली. काही दिवसांनी तर प्रकरण मारहाणीवर जाऊ लागलं. याची कल्पना मंजूमनं तिच्या वडिलांना दिल्यानंतर त्यांनी तिला माहेरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान
सासरच्या मंडळींनी मात्र तिला माहेरी पाठवायलाच नकार दिला. जोपर्यंत गाडी मिळत नाही, तोपर्यंत मंजूमला माहेरी पाठवणार नाही, असं मंजूमच्या पतीने म्हटलं. मंजूमच्या वडिलांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलिसांनी त्यांना त्यांचाच दोष असल्याचं सांगितलं आणि परत पाठवलं. एसपींनाही वडील जाऊन भेटले, मात्र त्यांनीदेखील काहीच प्रतिसाद दिला नाही. घटनेच्या दिवशी सुनेला जबर मारहाण झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला सासरच्यांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र उपचारादम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सासरची मंडळी रुग्णालय सोडून पळून गेली.
कारसाठी केली बेदम मारहाण, पत्नीचा मृत्यू
माहेरच्यांना फोन करून त्यांनी तुमची मुलगी रुग्णालयामध्ये दाखल असल्याचं कळवलं. तिचे वडील रुग्णालयात पोहोचले असता, आपल्या मुलीचं निधन झाल्याचं त्यांना समजलं. ते ऐकून त्यांना जबर मानसिक धक्का बसला. मंजूमला जबर मारहाण झाल्याचं तिचा चेहरा आणि शरीरावरील खुणांवरून दिसून येत आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. य़ा घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.