नवी दिल्ली - राजस्थानच्या अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेचा गणवेश घेतला नाही म्हणून अलवरमध्ये एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. गळफास लावून त्याने आपलं जीवन संपवलं. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये आई, तुला माझ्याकडून ही वाढदिवसाची भेट असल्याचं मुलाने म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच बहरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी अल्पवयीन मुलाचा मृतदेह खाली उतरवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "आता तुला शाळेत जाण्यास कधीच उशीर होणार नाही. वाढदिवसाची जगातील सर्वोत्तम भेट. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई" असं मुलानं चिठ्ठीत लिहिलं आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलाची आई शाळेत शिक्षिका आहे. काही वर्षांपूर्वी मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आई आणि मुलगा एका भाड्याच्या घरात राहत होते.
मुलाने दोन दिवसांपासून आईकडे शाळेचा गणवेश खरेदी करण्याचा आग्रह धरला होता. तुझ्यासाठी गणवेश शिवू असं आईनं मुलाला सांगितलं होतं. शुक्रवारी आईचा वाढदिवस होता. त्यादिवशी मुलानं आईकडे पुन्हा गणवेशासाठी हट्ट केला. त्यावर आई ओरडली. मला शाळेत जाण्यास उशीर होत आहे. संध्याकाळी आल्यावर तुझ्यासाठी गणवेश शिवायला देऊ, असं आई म्हणाली. यामुळे मुलाला नाराज झाला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
आई घरी परतली त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. आईने अनेकवेळा आवाज दिला. मात्र तिला आतून उत्तर मिळालं नाही. त्यानंतर आईने शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडला. त्यावेळी मुलगा गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना देण्यात आली. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.