जळगाव - रेशनकार्डाची दुय्यम प्रत तयार करुन देण्यासाठी महिलेकडून ४०० रुपयांची लाच स्विकारताना जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचा पंटर पराग पुरुषोत्तम सोनवणे (वय ३९, रा.खोटे नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. पराग याला अटक करण्यात आली असून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे रेशनकार्ड जुने व जीर्ण झालेले असल्याने ते रेशनकार्डची दुय्यम नविन प्रत मिळण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत जळगाव येथे अर्ज घेऊन गेले असता तेथे बसलेला खासगी पंटर पराग याने हे काम करुन देण्यासाठी चारशे रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव ,संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर,मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी,नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने पुरवठा विभागात सापळा रचला. ४०० रुपये स्विकारताना पराग याला रंगेहाथ पकडण्यात आले.