पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आरजेडी पक्षाचे माजी नेत्याच्या हत्येप्रकरणी लालू यादवांच्या दोन्ही सुपुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजदचे एससी, एसटी विभागाचे माजी सचिव शक्ति मलिक यांची रविवारी हत्या करण्यात आली. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्यात पूर्णिया जिल्ह्यातील मुर्गी फार्म रोडजवळ 35 वर्षीय मलिक यांची अज्ञांकडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृताच्या कुटुंबीयांनी यादव पुत्रांवर हत्येचा आरोप लावला आहे. शक्ती मलिक हे अररियाच्या रानीगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. त्यामुळे, राजदच्या नेत्यांनी निवडणुकीच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या केल्याचा आरोप मलिक यांच्या नातेवाईकांनी केलाय. सन 2019 मध्ये मलिके राजदमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर, पक्षाकडून त्यांना एससी,एसटी विभागाच्या राज्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रानीगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचे मलिक यांनी म्हटले होते. तसेच, या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट मागितल्यानंतर राजद नेता तेजस्वी यादव यांनी 50 लाख रुपये मागणी केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. मलिक यांच्या पत्नीने सांगितले की, रविवारी सकाळी तीन अज्ञात तरुणांनी जवळून गोळ्या मारत मलिक यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर तत्काळ त्यांना जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या सांगण्यावरुनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप शक्ती मलिक यांच्या पत्नी खुशबू देवीने केला आहे. खुशबू देवीच्या फिर्यादीवरुनच तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पूर्णीयाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी सांगितले.
बिहारमध्ये भाजपा नेत्याचीही हत्या
भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बिहार हादरलं आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील तेजप्रताप नगरात ही घटना घडली होती. भारतीय जनता पक्षाचे जयंत मंडलचे उपाध्यक्ष राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा हे मॉर्निंग वॉकला गेले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राजेश कुमार झा यांचा जागेवरच मृत्यू झाला. बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम एंटरटेनमेंट हॉलजवळ ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती.
निवडणुकीसाठी काँग्रेस-राजदची महाआघाडी
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीने शनिवारी जागा वाटप जाहीर केले. सर्व पक्षांनी तेजस्वी यादव यांना आघाडीचे नेते म्हणून समर्थन दिले. या आघाडीत २४३ सदस्यीय विधानसभेत राजद १४४, काँग्रेस ७० जागा लढविणार आहे. माकपा ६, भाकपा ४ आणि भाकपा (माले) यांना १९ जागा देण्यात आल्या आहेत. या जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर काही वेळातच व्हीआयपी पार्टीचे नेते मुकेश सहनी यांनी आपल्या पक्षाला जागा न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि महाआघाडीतून वेगळे होत असल्याची घोषणा केली. राजदने आम्हाला धोका दिला, असा आरोपही त्यांनी केला.
लालूप्रसाद महाआघाडीचे बॉस
लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेसची मागणी मान्य केली आणि त्यांना ७० जागा दिल्या. अर्थात, काँग्रेसला यासाठी लालूप्रसाद यांची अट मान्य करावी लागल्याचे सांगितले जाते. ती म्हणजे तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल. त्यामुळे लालूप्रसाद हेच आघाडीचे बॉस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.