पाटणा : बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. रोख रक्कम मोजणारी यंत्रे मागवून या नोटा मोजण्यात आल्या. संजयकुमार राय याच्या लाचखोरीबद्दल आलेल्या तक्रारींनंतर दक्षता विभागाने या धाडी टाकल्या.
संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाटणा येथील दोन व किशनगंज येथील तीन ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यात पाटणामधून एक कोटी व किशनगंज येथून चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. संजयकुमार राय याचे पाटणा येथील वसंत विहार कॉलनीमध्ये घर आहे. परंतु, तो सध्या किशनगंज जिल्ह्यात कार्यरत आहेत. दक्षता विभागाच्या दोन पथकांनी शनिवारी सकाळी सात वाजता पाटणा व किशनगंज येथे धाडी टाकल्या.
किशनगंज येथे दक्षता विभागाच्या १३ अधिकाऱ्यांच्या पथकाने राय याच्या रुईधाशा, आणखी एक अभियंता ओमप्रकाश यादव याच्या लाईनपाडा व त्याच्या कार्यालयातील रोखपाल खुर्रम सुल्तान याच्या लाइनपाडा येथील निवासस्थानी धाडी टाकल्या. लाच म्हणून मिळालेले पैसे राय याच्यावतीने ओमप्रकाश यादव स्वीकारत असे. राय व अन्य दोघांच्या बँक खात्यातील व्यवहारांचीही दक्षता विभाग तपासणी करणार आहे. (वृत्तसंस्था)
लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमलाराय याच्या कार्यालयातील आणखी एक अभियंता ओमप्रकाश यादव याच्या घरी ४ कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाली तर रोखपालाच्या घरात सुमारे काही लाख रुपयांचे घबाड मिळाले. तर राय याच्या पाटणा येथील घरातून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्याशिवाय राय याच्याकडे लाखो रुपयांचे दागिने सापडले असून, त्याने जमीनजुमला खरेदी केल्याची व विविध ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केल्याची कागदपत्रे दक्षता विभागाने ताब्यात घेतली आहेत.