नवी दिल्ली - दिल्लीमध्ये चोरांनी कमाल केली आहे. चोर जेव्हा चोरी करतात तेव्हा त्यांचे अनेक हेतू असतात. मात्र ज्या हेतूने चोरांनी चांदणी चौकात काजूवर डल्ला मारला ते आश्चर्यकारक आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत चोरट्यांनी चांगल्या आरोग्यासाठी काजूची चोरी केली आहे. चोरट्यांनी पाच-दहा पाकिटं नाही, तर तब्बल 6 क्विंटल काजूची चोरी केली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी तीन काजू चोरांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील लाहोरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील चांदनी चौकातून 580 किलो काजू चोरीची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दुकान मालकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी 580 किलो काजूसह तीन आरोपींना अटक केली आहे. चांदणी चौकातील एका ड्रायफ्रुटच्या दुकानातून दोन दिवसांपूर्वी चोरीची ही घटना घडली होती. मात्र अवघ्या 36 तासांत पोलिसांनी या चोरांना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केल्यानंतर या चोरांनी चांगल्या आरोग्यासाठीच काजूची चोरी केल्याचं सांगितलं आहे. हे चोर व्यायामशाळेत जातात आणि चांगली बॉडी होण्यासाठी काजू मोठ्या प्रमाणात लागतात, असे सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी ही चोरी करण्याचा निर्णय घेतला. या चोरट्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या काजूची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांची ओळख पटवली आणि त्यानंतर काजू चोर पकडले गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.