नवी दिल्ली - देशामध्ये अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये पतीच हैवान झाल्याचं समोर आलं आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं होतं. तब्बल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर असून ती मृत्यूशी झुंज देत होती. यानंतर आता या घटनेतून सावरलेल्या पीडित सुजाताने तिची वेदनादायक कहाणी सांगितली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजाता आणि तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अभियंता पदावर असलेल्या सुजाताच्या पतीने सुजाताला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. 8 जानेवारी 2022 ला लालरूमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सुजाताने सांगितले की, 2011 मध्ये तिचं लग्न झालं होतं. ती सध्या गर्भवती आहे. तसेच तिला एक 6 वर्षांचा मुलगाही आहे. सुरुवातीपासूनच सासरच्या मंडळींचं तिच्याशी वागणं खूप चुकीचं होतं. तिला कुठेच घेऊन जात नव्हते. जेव्हा ती चुकून पंजाबीत बोलायची तेव्हा तिला मारहाण केली जात होती. तिचा पती मर्चंट नेव्हीमध्ये आहे. त्याचे बाहेर कुठेतरी एका मुलीशी प्रेमसंबंध होते. जिचे नाव मी एफआयआरमध्येही दिले आहे. जानेवारीपासून दररोज पोलिसांच्या चकरा मारत आहेत, मात्र आजतागायत पोलिसांनी या प्रकरणी कोणाला अटक केली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.