नवी दिल्ली - पैशांसाठी अनेकदा काही लोकांचं अपहरण केलं जातं. तर चित्रपट आणि मालिकांमध्ये पैसा मिळावा म्हणून काही जणांनी स्वत:च्याच अपहरणाचं नाटक केलेलं पाहायला मिळतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि वडिलांकडे तब्बल 30 लाख मागितले आहेत. चेन्नईमध्ये वडिलांकडून पैसे उकळण्याकरता एका 24 वर्षांच्या तरुणाने हे अपहरण नाट्य रचलं होतं. या तरुणाला त्याच्या वडिलांकडून तब्बल 30 लाख रुपये उकळायचे होते. पण चेन्नई शहर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अत्यंत हुशारीने त्याला पकडलं आहे.
मुलाचं अपहरण झाल्याचं समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेगच पोलिसांना कॉल करून याबाबत माहिती दिली. यानंतर चेन्नई पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेस करून सिकंदराबादमधील लोकेशन शोधून काढलं आणि रंगहात पकडलं. पण त्यानंतर तरुणाने सांगितलेलं कारण ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी. के. कृष्ण प्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. वडापालिनीमध्ये राहणाऱ्या पेनसिलाया या 54 वर्षांच्या व्यावसायिकांच्या दोन मुलांपैकी पी. कृष्ण प्रसाद हा धाकटा मुलगा आहे.
कृष्ण प्रसादला एक शॉर्ट फिल्म शूट करायची होती. त्यासाठी त्याला पैसे हवे होते, अशी माहिती मिळाली आहे. 14 जानेवारी रोजी पेनिसालाया यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांचा मुलगा आदल्या दिवशी एका स्थानिक शॉपिंग मॉलमध्ये गेला होता, तो परत आलाच नाही अशी तक्रार त्यांनी नोंदवली. कृष्ण प्रसादच्या फोन नंबरवरून त्यांना एक मेसेज आल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांच्या मुलाचं अपहरण झालं आहे आणि जर तो त्यांना परत हवा असेल तर तब्बल 30 लाख रुपयांची रक्कम त्यांनी द्यावी अशी मागणी या मेसेजमधून करण्यात आली होती.
इन्स्पेक्टर प्रवीण राजेश यांच्या नेतृत्वाखाली वडापालिनी पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यांनी या चौकशीसाठी एक टीमही नेमली. सायबर क्राईम विभागही पोलिसांच्या मदतीला आला. त्यांनी कृष्ण प्रसादचा मोबाईल ट्रेस करून तो तेलंगणातल्या सिकंदराबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. चेन्नई पोलीस मग सिकंदराबाद शहरात पोहोचले आणि तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखेर कृष्ण प्रसादची कृष्ण प्रसादच्याच तावडीतून सुटका केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.