भोपाळ - मध्य प्रदेशमधील इंदूर येथे एका पत्नीने तिच्या रंगेल पतीला चांगलीच अद्दल घडवल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने पतीचा रंगेलपणा उघड करण्यासाठी जबरदस्त योजना आखली. तिने सर्वप्रथम फेसबूकवर बनावट नावाने एक आयडी तयार केला. त्यानंतर पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तसेच ही रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतर दोघेही एकमेकांसोबत बोलू लागले. त्यादरम्यान, या पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीला दुसरी तरुणी समजून तिच्याकडे किस आणि सेक्सची मागणीसुद्धा केली. मात्र जेव्हा सत्य समजले तेव्हा या रंगेल पोलीस अधिकाऱ्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली.
इंदूरमधील सुखलिया येथीर रहिवासी असलेल्या मनिषा चावंड हिचा सत्यम बहल याच्याशी २०१९ मध्ये विवाह केला होता. नव्या नवरीचे सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. मात्र काही दिवसांनी तिचा कठीण काळ सुरू झाला. पोलीस कर्मचारी असलेला सत्यम बहल तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. पत्नीला किरकोळ कारणांवरून बाथरूमध्ये कोंडून ठेवू लागला. तसेच मारहाणही करू लागला.
त्रस्त तरुणीने याबाबतची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर महिला पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पती घरात पेपरही वाचू देत नाही. एवढंच नाही तर हुंड्यामध्ये दुचाकीची मागणी करतो, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्याच्या अटकेचे आदेशही निघाले. सध्या तो जामिनावर बाहेर असून, कोर्टात खटला सुरू आहे.
माहेरी राहत असताना पीडित मनिषा हिला पतीवर संशय आला. तेव्हा तिने पतीला बनावट फेसबूक आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. सोशल मीडियावर स्वत:ला सिंगल दाखवणारा सत्यम तिच्यासोबत तासनतास बोलू लागला. एवढंच नाही तर त्याने किस आणि सेक्सचीही मागणी केली. दरम्यान, पत्नीने या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट कोर्टात पुरावा म्हणून शेअर केले आहे.
दरम्यान, पीडितेच्या आरोपांची दखल घेताना इंदूरमधील जिल्हा न्यायालयाने आरोपीविरोधात कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने गेल्या सोमवारी या महिलेला खर्च म्हणून २ लाख रुपये आणि पोटगी म्हणून दरमहा ७ हजार रुपये देण्याचे आदेश पतीला दिले आहेत.