नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. जिल्हा न्यायालयात वकिलाच्या चेंबरमध्ये एक मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. सकाळी वकिलाने चेंबर उघडले आणि तरुणाचा मृतदेह बघून कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या महितीनुसार, तरुण कोर्ट परिसरातील वकिलाच्या चेंबरमध्ये रात्री झोपायचा. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणाचा मृत्यू अंमली पदार्थ सेवन केल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येत आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या (Tis Hazari Court Delhi) परिसरात उपस्थित असलेल्या वकिलांनी चेंबर उघडल्यावर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पश्चिम विभागातील वकिलाच्या चेंबरमध्ये मृतदेह पडलेला होता. उत्तर दिल्ली जिल्हा डीसीपीने दिलेल्या माहितीनुसार, मनोज असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. तो 35 वर्षांचा होता. या घटनेची माहिती तीस हजारी बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना आणि मृतकाच्या ओळखीच्या लोकांना देण्यात आली आहे. मनोज मूळचा बिहारचा असल्याची माहिती मिळाली आहे.
पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात
घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मृताच्या शरीरावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. अंतर्गत दुखापत असेल तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळेल. त्यामुळे मृत्यूमागचं ठोस कारण सांगता येणार नाही. पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मनोज या तरुणाला दारू पिण्याचे व्यसन होते. तो क्षयरोगामूळे दीर्घकाळ आजारी होता. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.