परंडा (जि. उस्मानाबाद) : आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या परंडा पोलीस पथकाच्या डोळ्यांत चटणी टाकून काठ्या-कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री परंडा शहरानजीक घडली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परंडा शहराजवळ असलेल्या वस्तीवरील काही जणांविरुद्ध तक्रार होती. औदुंबर प्रकाश पाटील यांच्या शेतीच्या वादातून हा गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्या तपासासाठी परंडा ठाण्यातील पोलीस पथक पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. चौकशी दरम्यान तपासप्रमुख उपनिरीक्षक राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी कोयता, दगड, काठीने मारहाण करुन तपास पथकावर हल्ला चढवला.
पथकातील महिला कर्मचारी शबाना मुल्ला यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस कुमक घटनास्थळी पोहोचताच पाटील कुटुंबीयांनी पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकून तुफान दगडफेक केली. या घटनेत उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यासह काही कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात डांबून मारहाणतपास प्रथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांना आरोपी पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या घरात डांबून मारहाण केली. त्यांच्याही डोळ्यांत चटणी टाकून काठीने मारहाण करण्यात आली. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. पोलिसांची कुमक आल्यानंतर पाटील कुटुंबातील अनेकांनी पळ काढला. यानंतर जखमी ससाणे यांची सुटका झाली.
दोघे ताब्यात, चौघे पसार पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची माहिती कळल्यानंतर परंडा पोलिसांची कुमक घटनास्थळावर दाखल झाली. मोठा फौजफाटा पाहून अंधाराचा फायदा घेत उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील हे पसार झाले. तर पोलिसांनी पल्लवी उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे.