नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला असून चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यावर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचं घर शेजाऱ्यांनीच गुपचूप विकल्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये गृह मंत्रालयाच्या एका महिला अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या आपल्या घरामध्ये एकट्याच राहत होत्या. याचाच गैरफायदा शेजाऱी राहणाऱ्या तरुणाने घेतला.
महिला अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या घराचे काही खोटे पेपर तयार केले आणि ते घरं विकल्याची धक्कादायक घटना आता उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणाऱ्या महिलेच्या मुलाला जेव्हा या भयंकर प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्याने दिल्ली गाठत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एडवर्ड कोलिंस जेम्स हे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. ते सध्या पुण्यातील एका कंपनीत काम करतात.
एडवर्ड यांनी आपल्या तक्रारीत आपली आई पुनिता कुमारी हे या गृह मंत्रालयात अधिकारी होती. त्यामुळे आपलं कुटुंब दिल्लीमध्ये राहतं असं सांगितलं. वडील कामानिमित्त कुवैतला असल्याने दिल्लीतील सरकारी क्वार्टरमध्ये आई एकटी राहत होती. मात्र त्यांनी नजफगडच्या रोशन गार्डनमध्ये एक फ्लॅट घेतला होता. आईच ते घर देखील पाहत होती. पण एप्रिल 2021 मध्ये कोरोनामुळे आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यची माहिती मिळताच शेजाऱ्याने कट रचला आणि याचाच गैरफायदा घेतला.
घराचे खोटे पेपर तयार केले आणि घर विकलं. जूनमध्ये एडवर्ड यांना त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने घर विकलं गेल्याची माहिती दिली. हे ऐकून एडवर्ड यांना धक्काच बसला. दिल्ली येऊन त्यांनी याबाबत चौकशी केली. त्यावेळी मनीष नावाची एक व्यक्ती त्यांच्या घरात राहत होती. त्यांनी याबाबतचे पेपर दाखवून घरी खरेदी केल्याचं सांगितलं. यानंतर एडवर्ड यांनी पोलिसांत धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.