नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा नेत्याची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरात भाजपा नेते जीतू चौधरी (BJP Jitu Chaudhary) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जीतू चौधरी यांच्यावर हल्लेखोरांनी 6 गोळ्या झाडल्या आहेत. चौधरी हे भाजपाचे मयूर विहार जिल्ह्याचे मंत्री होते.
40 वर्षीय जीतू चौधरी याचा बांधकाम व्यवसाय होता. त्यांचा एका ठेकेदारासोबत पैशांवरून वाद सुरू होता. हत्येमागे व्यवहाराचा वाद असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौधरी यांच्यावर बुधवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने सर्वांनाचा धक्का बसला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास गाझीपूर पोलीस स्टेशनच्या बीट कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगदरम्यान मयूर विहार परिसरात गर्दी दिसली. ज्यामध्ये जितेंद्र उर्फ जीतू चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
जीतू चौधरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून जखमी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर लोकांनी त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात नेले. त्याचवेळी रुग्णालयात डॉक्टरांनी जीतू चौधरी यांना मृत घोषित केलं. घटनास्थळावरून काही रिकामी काडतुसे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.