नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने पार्टीत गोंधळ घातला. इतकंच नाही तर आलेल्या पाहुण्यांना ग्लास फेकून मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर कैलास पोलिसांना एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात तक्रार आली आहे. शुक्रवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीत आयपीएस अधिकाऱ्याने जास्त दारू पिऊन गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.
दारूच्या नशेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने इकडे तिकडे ग्लास फेकायला सुरुवात केली. यातून तेथे उपस्थित असलेल्या महिलेच्या डोक्याला काच लागली. जखमी महिलेला तिच्या पतीने नोएडा येथील मॅक्स रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे महिलेला टाके घालण्यात आले. महिलेच्या पतीने पीसीआर कॉलवर पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. दिल्लीतील कैलास कॉलनीतील एका कॅफे आणि बारमध्ये एका व्यावसायिकाने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. ही महिला तिच्या व्यावसायिक पतीसोबत या पार्टीला गेली होती.
रिपोर्टनुसार, अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ सुरू केला. काही मित्रांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ग्लास फेकण्यास सुरुवात केली. त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेला ग्लासची काच लागली. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला नोएडा येथे राहते आणि ती व्यवसायाने डिझायनर आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आरोपी आयपीएस अधिकाऱ्याची अंतर्गत चौकशीही सुरू झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.