नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. दिल्लीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेने घरच लुटल्याची भयंकर घटना घडली. दिल्लीच्या पश्चिम विहार पूर्वमधील परिसरात एका व्यावसायिकाच्या पत्नीला धमकावून घरातून जवळपास दोन कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 50 लाखांचे दागिने लुटण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घरामध्ये काम करणाऱ्या महिलेनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने मोठा डल्ला मारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र सिंह हे पश्चिम विहारातील शुभम एनक्लेव्हमध्ये त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा मुंडका परिसरात डोअर फिटिंगचा कारखाना आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी मीना आणि हेमा नावाच्या दोन महिलांना घरकामाला ठेवलं होतं. या दोघी घराच्या तळमजल्यावरील एका खोलीत राहत होत्या. दोन नोव्हेंबरला रविंद्रची पत्नी हरमीत कौर आणि त्यांचा मुलगा कबीर घरी होते. त्यावेळेस घरात काम करणाऱ्या महिलेने एका अनोळखी व्यक्तीला घरात घेतलं. त्याच्या हातात स्क्रू ड्रायव्हर होता.
जवळपास दोन कोटी रुपये आणि पन्नास लाखांचे दागिने घेऊन फरार
घरात घुसलेली व्यक्ती हरमीत कौरला मारण्याची धमकी देऊ लागला आणि तो तिला एका खोलीत घेऊन गेला. तेवढ्यात तिथे आणखी दोन तरुण आले. या तिघांनी एक चादर फाडून त्या चादरीने हरमीत कौर आणि तिच्या मुलाला बांधलं. तेवढ्यात तिथं त्यांची भाची आणि वहिनी आल्या. त्यांनाही या चोरांनी बांधून ठेवलं आणि घरातील जवळपास दोन कोटी रुपये आणि पन्नास लाखांचे दागिने घेऊन हे चोर फरार झाले. त्यानंतर थोड्या वेळाने हरमीत कौर यांनी स्वत:ची कशीतरी सुटका करून घेतली.
घरकाम करणारी महिला फरार
हरमीत कौर यांनी इतरांचीही सुटका केली. त्यानंतर या घटनेबद्दलची माहिती त्यांचे पती आणि पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर घरकाम करणारी महिला फरार झाली आहे. तिच्यासह अन्य तीन चोरांची ओळख पटवण्यासाठी आता प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाचीही पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात आहे. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यावर या मोलकरणीच्या ओळखीनेच हे चोर घरात घुसल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.